पुणे : राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. अशा राज्यांमध्ये इंडिया आघाडीच्या भागीदारांमध्ये कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत यासाठी खबरदारी घेऊ, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केले. ते पुणे जिल्ह्यातील बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षण, कांद्यावरील निर्यात शुल्क या मुद्द्यांवरही पवार यांनी भाष्य केले.
दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांनी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचा मुकाबला करण्यासाठी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) ची स्थापना केली आहे. छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने काही जागांवर दावा केल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये स्पष्ट मतभेद असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, नजीकच्या भविष्यात तेथे निवडणुका नाहीत. निवडणुका जवळ आल्यावर मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, आम्ही आघाडीचे तटस्थ नेते पाठवून प्रश्न सोडवू. मुंबईत परतल्यानंतर मी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करेन आणि त्यांच्यात कोणतेही वाद होणार नाहीत याची खबरदारी घेऊ. येत्या आठ-दहा दिवसांत ही प्रक्रिया सुरू होईल, असे पवार म्हणाले.