
महाविकास आघाडी स्थापन करून आमची कोणतीच चूक नव्हती. लोकांनी उलट आघाडीचे स्वागतच केले असे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ठाकरे म्हणाले की, त्यांना महाराष्ट्रात केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर विधानसभा निवडणुकाही लढायच्या आहेत.
“दिल्लीला शिवसेनेशी लढायचे आहे आणि मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांची भीती वाटत असेल तर ती त्यांची अक्षमता आहे. लोकशाहीत कोणताही पक्ष कायमस्वरूपी विजेता नसतो." असेही ते म्हणाले. भाजपने त्यांना दिलेले वचन न पाळल्यामुळे तीन पक्षांची युती करावी लागली. सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत ठाकरे म्हणाले, "शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री होणार असून, पक्षाचा पाया आणि कार्यकर्त्यांच्या विस्तारासाठी मी काम करणार आहे. मी ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू करणार अधिकाधिक लोकांनी पक्षाचे सदस्य व्हावे अशी माझी इच्छा आहे.”