आता हवाई सुंदरीच्या धर्तीवर 'शिवनेरी सुंदरी'; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, तिकीट दर वाढणार?

आता हवाई सुंदरीच्या धर्तीवर 'शिवनेरी सुंदरी'; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, तिकीट दर वाढणार?

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ‘ई-शिवनेरी’ बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सुंदरींच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे.
Published on

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ‘ई-शिवनेरी’ बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सुंदरींच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

तिकीट दर वाढणार?

तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवासुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे, असे एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या बैठकीमध्ये सांगितले.

शिवनेरी सुंदरी बसमध्ये चढताना आणि उतरताना ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना मदत करेल. बसमध्ये जेवण दिले जाणार नसले तरी, प्रवाशांना शौचालयाचा वापर करण्यासाठी आणि अल्पोपहारासाठी वाटेत एक थांबा असेल. बस संपूर्ण प्रवासात स्वच्छ आणि नीटनेटकी राहील याची देखील शिवनेरी सुंदरी खात्री करेल. ती बसमधील एसी आणि तापमानाचे निरीक्षण करेल.

एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ‘ई-शिवनेरी’ बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी ‘शिवनेरी सुंदरी’ (परिचारिका) नेमण्यास मान्यता देण्यात आली.

या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासीबहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारून एक स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडळाचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

२,५०० साध्या नवीन बसेसची खरेदी

या बैठकीत २,५०० साध्या नवीन बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना मान्यता देण्यात आली.

३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौरस सेंटीमीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयाची आहे.

logo
marathi.freepressjournal.in