अमरावती : तेलगु देसम पक्षाचे सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ आवाहन करण्यात आलेल्या अखिल आंध्र प्रदेश बंदला सोमवारी जनतेकडून अल्प प्रतिसाद मिळाला, मात्र पोलिसांनी अनेक पक्ष कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अनुचित प्रकार टाळण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बहुतांश भागात जनव्यवहार सुरळीत सुरू होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात कुठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नाही. प्रतिबंधात्मक कारवार्इ म्हणून पोलिसांनी विशाखापट्टणम आणि चित्तूर येथून अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. राज्य सरकारच्या सर्व बस नियमितपणे धावत होत्या, तसेच व्यापार उदीम देखील व्यवस्थित सुरू होते. जनजीवन अत्यंत सुरळीत सुरू होते, अशी माहिती विशाखापट्टणमचे पोलीस उपायुक्त व्ही. विद्यासागर नायडू यांनी पीटीआयला दिली आहे. एकूण ८० जणांना ताब्यात घेतले होते, असेही ते म्हणाले.
पूर्व गोदावरी जिल्ह्यात परिस्थिती सामान्य होती. येथेच सेंट्रल जेल असून नायडू यांनाही याच जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच चित्तूर जिल्ह्यात काही जणांना सार्वजनिक मालमत्तेची मोडतोड करण्याच्या प्रयत्नात पकडले असल्याची माहिती तेथील पोलीस अधीक्षक वाय. रिशनाथ रेड्डी यांनी दिली आहे. विजयवाडा येथील न्यायालयाने रविवारी चंद्राबाबू नायडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोट्यावधी सरकारी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर राज्यातील अनेक तेलगु देसम कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यात राज्याचे पक्षाध्यक्ष के. अटचननायडू यांचाही समावेश आहे.