राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे - देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, तरी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे - देवेंद्र फडणवीस

राज्याला गेल्या दोन दिवसांत अवकाळीने झोडपले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक झाले होते. मात्र, यावरील स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा नाकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या संवेदनाच बोथट झाल्याची टीका केली, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विरोधकांचे नक्राश्रू असल्याचा प्रतिटोला लगावला. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

राज्यात गेल्या दोन दिवस अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. विधानसभेत याचे पडसाद उमटले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, तरी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली. कामकाज बाजूला ठेवून या विषयावरील स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले यांनीही आक्रमक भूमिका मांडली. मात्र, विरोधकांची स्थगनद्वारे चर्चेची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली. अध्यक्षांच्या या भूमिकेनंतर विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू करत सभात्याग केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in