
मंत्रालयात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरु करावी तसंच कंत्राटी भरती प्रक्रिया राबवू नये, यासाठी एका व्यक्तीने मंत्रालयात असलेल्या संरक्षण जाळीवर उडी घेतल्याची घटना घडली. पोलिसांनी जाळीवर उडी घेतलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलकांकडून मागण्या मान्य करण्यासाठी जाळीवर उड्या मारण्याचं प्रमाण वाढलं आहे.
रखडलेली शिक्षक भरती तात्काळ सुरु करावी. तसंच कंत्राटी भरती तात्काळ बंद करास या मागणी साठी संबंधित व्यक्तीने आंदोलन केलं. यानंतर त्याने आक्रमक होत मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उडी घेतली. यावेळी या व्यक्तीकडून घोषणाबाजी देखील झाली. पोलिसांनी या व्यक्तीला बाहेर येण्याची विनंती केली. यानंतरही हा व्यक्ती बाहेर येत नसल्याने एका पोलिसाने स्वत: या जाळीवर उडी घेत या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी कंत्राटी भरतीसाठी एक जीआर काढला होता. राज्य शासनाच्या या निर्णयाला सर्व वर्गातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. या कंत्राटी भरतीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. याचं पार्श्वभूमीवर या व्यक्तीने जाळीवर उडी घेत कंत्राटी भरती बंद करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका शेतकऱ्याने मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या मंत्रालयाती संरक्षण जाळीवर उडी मारुन आंदोलन करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे मंत्रालयातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.