अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन ; सुप्रिया सुळेंनी केली प्रशंसा

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुळे यांनी अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन
अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन ; सुप्रिया सुळेंनी केली प्रशंसा

महानायक अमिताभ बच्चन सर्वांना सगळ्याच सिनेमांत हवा असतो. त्यांचा आवाजही चालतो, त्यांचा फोटोही चालतो, त्यांचा लूकपण चालतो, त्यांची ऑटोग्राफही चालते. त्यामुळेच अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, अशी प्रशंसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १० जूनला सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर सुळे या प्रथमच पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आल्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे पक्षात जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांना अजित पवार यांची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी करण्याचा मोह आवरला नाही. सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याने अजित पवार पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुळे यांनी अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असे सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंचे प्रकरण ज्या पद्धतीने पोलिसांनी हाताळले हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पद्धतीच्या घटना वाढत चालल्या त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप सुळे यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबाबत वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीवरून सुळे यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

अशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देणारे कोण आहेत याचा शोध मी आणि अजितदादा घेत आहे. मात्र अजून तरी असा हितचिंतक कुणी सापडलेला नाही. असे हितचिंतक आम्हालाही मिळाले पाहिजेत आणि कोट्यवधी रुपयांच्या पूर्ण जाहिराती वर्तमानपत्राला मिळाल्या तर आमचेही भले होईल आणि त्यांचेही भले होईल. त्यामुळे अशा लोकांच्या शोधात असून असे हितचिंतक सापडले तर आमचा नंबर त्यांना द्या, असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी काढला.

पक्षात कार्याध्यक्षपदाच्या कामाचे विभाजन झालेले आहे. माझा मतदारसंघ महाराष्ट्रात आहे. अर्थात संघटनेची जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यामुळे दिल्लीत मला लोकसभा आणि प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभा असे कामाचे विभाजन झाले आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर नाही. एक टीमवर्क म्हणून आम्ही देशात काम करतो. प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे. घरात लग्न असले की एकटाच धावपळ करत नाही तर प्रत्येकाला जबाबदारी दिलेली असते. त्यानुसार आम्ही पक्ष म्हणून, एक कुटुंब म्हणून काम करत आहोत. हे काम करत असताना प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्याबाबत अनेक बैठका झाल्या आणि सविस्तर चर्चाही झाल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल, असे सुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in