सूर्याचा यूव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर चार दिवस भरदुपारी घराबाहेर पडणे टाळा

सूर्याचा यूव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर
चार दिवस भरदुपारी घराबाहेर पडणे टाळा

मंगळवारपासून पुढील चार दिवस राज्यावर उष्णतेच्या लाटेचे सावट आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भातील काही शहरांचे तापमान ४३ ते ४४ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तापमान वाढत असल्याने सूर्याचा यूव्ही इंडेक्स (अतिनील किरणे) ११ या सर्वाधिक जोखमीच्या पातळीवर असेल. त्यामुळे पुढील चार दिवस सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान थेट सूर्यप्रकाशात जाणे धोक्याचे ठरणार आहे.

राजस्थान, गुजरातसह वायव्येकडून येणारे शुष्क उष्ण वारे राज्यात धडकले आहेत. या वाऱ्यांचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यावर होणार आहे. या आठवड्यात राज्यात तापमान चाळिशी पार गेले असून येत्या एक एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट तीव्र होणार आहे. या लाटेचा परिणाम मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रावरदेखील होणार आहे. त्यामुळे तापमान पुन्हा एकदा ४३ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

उष्णतेची दुसरी लाट

यंदाच्या उन्हाळ्यात मार्च महिन्यात दुसऱ्यांदा राज्यात उष्णतेची लाट आली असून यावर्षी मार्च महिन्यात १७ ते १९ मार्चदरम्यान विदर्भ, कोकणात उष्णतेची पहिली लाट धडकली होती. आता २९ मार्च ते १ एप्रिलदरम्यान दुसरी उष्णतेची लाट येणार आहे. विदर्भात २८ मार्च रोजी अकोला शहराचे तापमान सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सियस होते. पुढील चार दिवसांत ते ४४ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

अतिनील किरणांमुळे उष्माघात

२८ मार्च रोजी राज्यात मुंबई वगळता बहुतांश शहरांचा सरासरी यूव्ही इंडेक्स (सूर्याची अतिनील किरणे) हा ९ ते १० या उच्च पातळीवर होता. पुढील चार दिवसांत तापमान वाढणार असल्याने यूव्ही इंडेक्स ११ (अत्युच्च) या धोकादायक पातळीवर राहण्याची भीती आहे. यूव्ही इंडेक्सची ही श्रेणी मानवी शरीरासाठी अतिशय धोकादायक असून अतिनील किरणे थेट शरीरावर पडल्यास त्वचा जळणे (सनबर्न), डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू, त्वचेचा कर्करोग, उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विषुववृत्ताच्या जवळ असल्याने महाराष्ट्रात यूव्ही इंडेक्स अधिक आहे.

मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट

२९ मार्च ते १ एप्रिलदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट असेल. लगतचा प्रदेश असल्याने या लाटेचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रावरदेखील जाणवेल. वायव्येकडील राज्याकडून वाहत येणाऱ्या गरम हवेमुळे या लाटेची तीव्रता वाढेल. दरम्यान, या लाटेनंतरही तापमानात वाढ होणार आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, भारतीय हवामान खाते, पुणे.

Related Stories

No stories found.