महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

ठाकरे तसेच शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाने दिले आदेश...
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी आणखी ४ आठवड्यांनंतर होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टातील पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

दोन्ही गटांमार्फत आज सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद झाले. यानंतर कोर्टाने दोन्ही पक्षकारांना आपापले युक्तिवाद लिखित स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. तीन आठवड्यात यासंदर्भातील कागदपत्र दाखल करण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकेवरील पुढील सुनावणी आता २९ नोव्हेंबरला ठरणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी कोणती तारीख द्यायची हे सांगितलं जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

शिंदे गट व ठाकरे गटात खरा शिवसेना पक्ष कोणाचा? यावरून अद्याप वाद सुरूच आहे. शिंदे गटाने पक्षावर हक्क सांगितल्यानंतर शिवसेनेची शकले करून निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले व दोन्ही गटांना नवीन पक्षचिन्ह आणि वेगळे पक्ष म्हणून नवीन नावे दिली आहेत. मात्र हा निर्णय हंगामी स्वरूपाचा असून, दोन्ही गटांनी सादर केलेल्या कागदपत्रांची निवडणूक आयोगाकडून छाननी सुरू आहे. त्यातच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. याबाबतचा निर्णय कुणाच्या बाजूने लागणार यावर महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in