सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक! व्हॉट्सॲपमध्येही व्यत्यय; मेसेज किंवा फोन करू नये, सुळेंचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याची माहिती त्यांनी स्वतः एक्सवर प्रसिद्ध केली आहे. फोन हॅक झाल्याने कोणी मेसेज किंवा फोन करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक! व्हॉट्सॲपमध्येही व्यत्यय; मेसेज किंवा फोन करू नये, सुळेंचे आवाहन
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याची माहिती त्यांनी स्वतः एक्सवर प्रसिद्ध केली आहे. फोन हॅक झाल्याने कोणी मेसेज किंवा फोन करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सॲप, ई-मेल, फोन हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही खाती हॅक झाल्याच्या तक्रारीही आहेत. त्यातच आता थेट एका खासदाराचा फोन हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे या सध्या पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा पुण्यातील दौंड भागात आहे.

हॅकिंगबाबत माझा कोणावरही आरोप नाही

सुळे यांनी सांगितले की, मी पुन्हा दोन-तीन जणांना माझ्या फोनवर मेसेज करण्यास सांगितले. त्यांनाही समोरून मेसेज आला. माझा फोन बंद आहे. मी सिमकार्ड काढले. तरीही जे कोणी मला मेसेज करतात, त्यांच्याशी कोण गप्पा मारत आहेत याची मला कल्पना नाही. माझा फोन हॅक झाल्यानंतर मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मी कोणावरही आरोप केलेले नाहीत. माझा फोन कोणी हॅक केला मला माहिती नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

नेमके काय झाले?

सुळे म्हणाल्या की, मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते. याचे कारण माझा फोन हॅक झाला. माझा फोन माझ्यासोबत इतर कोणीतरी ऑपरेट करत आहे. मी जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या हे लक्षात आले. या ठिकाणी आल्यावर माझे व्हॉट्सॲपच सुरू होत नव्हते. मी जयंत पाटील यांना मला नमस्कार मेसेज करा, असे सांगितले. त्यांनी तो मेसेज केल्यानंतर मी फोनवर काहीही न करता त्यांना समोरून नमस्कार असा मेसेज आला. यानंतर मी माझा फोन बंद केला.

logo
marathi.freepressjournal.in