जन्मठेपेवर निभावले

जन्मठेपेवर निभावले

फुटिरतावादी काश्मिरी नेता आणि जम्मू - काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासीन मलिक याला दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविल्याप्रकरणी दिल्लीच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा गुन्हा करून यासीन मलिकने भारताच्या वर्मावर घाला घातला असला तरी त्याने केलेला गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ प्रकारात मोडत नसल्याने त्याला फाशीची शिक्षा न देता जन्मठेपेची शिक्षा देण्यात आल्याचे एनआयए न्यायालयाचे न्या. प्रवीणसिंग यांनी म्हटले आहे. यासीन मलिक याने काश्मीर खोऱ्यामध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी, सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली होती. यासीन मलिकला हा पैसा विदेशी राष्ट्राकडून म्हणजे पाकिस्तानकडून मिळत होता. त्या पैशांचा वापर करून काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्यात आल्या. या हिंसक कारवायांमध्ये यासीन मलिकने थेट भाग जरी घेतला नसला तरी त्यामागील सूत्रधार तोच असल्याचे दिसून आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजे एनआयएने यासीन मलिकला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पण गेल्या १० मे रोजी यासीन मलिकने, गुन्ह्यांची कबुली दिल्याने न्यायालयाने त्याच्याबाबत मवाळ भूमिका स्वीकारली आणि त्याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. यासीन मलिकसारखा देशद्रोही, ज्या देशात लोकशाहीची आणि न्याय व्यवस्थेची बूज राखली जात नाही अशा देशात असता तर त्याला कधीचाच मृत्युदंड दिला गेला असता! भारतीय न्यायसंस्थेमुळे त्याचे जन्मठेपेच्या शिक्षेवर निभावले! यासीन मलिकला भारतीय दंड संहितेच्या कलम १२१खाली भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याबद्दल आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७ खाली दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्याबद्दल वेगवेगळ्या शिक्षा आणि दंड सुनावण्यात आला आहे. यासीन मलिकला या शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत. १९९४ नंतर आपण हिंसाचाराचा मार्ग सोडून दिल्याचे यासीन मलिकने म्हटले होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन भारत सरकारने त्याला सुधारण्याची प्रत्येक संधी दिली होती, त्याच्याशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला होता. पण त्याने भारत सरकारचा विश्वासघात करून हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक अशी कृत्ये करण्यासाठी पैसे पुरवून असंतोष निर्माण केला. दहशतवाद्यांना पैसे पुरविणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचे लक्षात घेऊन त्याबद्दल कठोरात कठोर शासन केले जावे, असे न्या. प्रवीणसिंग यांनी निकाल देताना स्पष्ट केले. विदेशी शक्ती आणि दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून केलेला गुन्हा आणखी गंभीर स्वरूपाचा ठरतो, असे न्यायालयाने म्हटले. कथित शांततापूर्ण चळवळीच्या आडून या सर्व गोष्टी करण्यात आल्या, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. आपण महात्मा गांधी यांचे अनुकरण करीत असल्याचा यासीन मलिक याचा दावाही न्यायालयाने खोडून काढला. महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानात हिंसाचारास मुळीच थारा नव्हता. चौरी चौरा येथे हिंसाचाराची एक लहानशी घटना घडल्यानंतर महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण असहकार आंदोलन मागे घेतले होते, पण आरोपीने काश्मीर खोऱ्यामध्ये प्रचंड हिंसाचार उसळला असताना त्याचा साधा निषेध केला नाही किंवा आपले आंदोलन मागे घेतले नाही, हे न्यायालयाने लक्षात आणून दिले. यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये त्याचे पडसाद उमटले. श्रीनगरमध्ये दगडफेक करणाऱ्या मलिक समर्थकांना पांगविण्यासाठी अश्रूधूर सोडावा लागला. तर काश्मीरमधील दहशतवादास खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला यासीन मलिकचे एकदम भरते आले! पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी, हा भारतीय लोकशाही आणि न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने काळाकुट्ट दिवस आहे, असे म्हटले आहे. मलिक यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असून त्याची कारागृहातून त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. मलिक यास जी शिक्षा देण्यात आली आहे त्यामुळे काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या हक्कास नव्याने बळ मिळेल, असे पाकिस्तानी पंतप्रधानांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे पाकिस्तानला अनेकदा बजावूनही काश्मीरशी संबंधित विषयांमध्ये पाकिस्तानकडून नाक खुपसणे सुरूच आहे, हे यासीन मलिक प्रकरणावरून पुन्हा एकदा दिसून आले. यासीन मलिकला फाशीच द्यावयास पाहिजे होती, अशी असंख्य भारतीयांची इच्छा होती. पण तसे घडले नाही. केवळ जन्मठेपेवर निभावले! काश्मीरमध्ये हिंसाचार माजवून सुरक्षा जवानांचे आणि निरपराध जनतेचे बळी घेणाऱ्या यासीन मलिकला आता दिल्लीच्या तिहार कारागृहात सडत पडावे लागणार आ

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in