'त्यांच्या' वेशभूषेवर आक्षेप घेऊन दाखवा; उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात सुषमा अंधारे यांची उडी

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आता मोठा वाद सुरु झाला आहे
'त्यांच्या' वेशभूषेवर आक्षेप घेऊन दाखवा; उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात सुषमा अंधारे यांची उडी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदच्या वेषभूषेवरून टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याबाबतची तक्रारदेखील केली होती. एवढेच नव्हे तर, 'उर्फी जावेदचे प्रताप थांबले नाहीत तर, तिला दिसेल तिथे थोबडवणार' असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. पण यांच्या वादामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील उडी मारली आहे. त्या चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, "उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?" असा सवाल चित्रा वाघ यांना विचारला आहे.

सुषमा अंधारे यांनी एक पोस्टमध्ये लिहिले आहे की, "उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप असेल, तर असाच आक्षेप तुम्ही कंगना रानौत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेणार का? यांनाही तुम्ही मारहाणीची भाषा वापराल का?. तसेच, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धी झोतात आणि चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकटत जाल." असा टोला त्यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.

सुषमा अंधारे यांच्या टीकेवर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल, तर तो झाला कामाचा भाग. यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही. पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणे हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.

पुढे त्या म्हणाल्या की, "व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान न राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणे , हाही धर्म नाही का? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का? स्त्री शिक्षित व्हाही, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचे, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in