रश्मी ठाकरेंबद्दलचे शब्द मागे घेतो - रामदास कदम

रश्मी ठाकरेंबद्दल तसे बोलायला नको होते, मी माझे शब्द मागे घेतो. मी अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला
रश्मी ठाकरेंबद्दलचे शब्द मागे घेतो - रामदास कदम

दापोली येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. त्यावर खुद्द रामदास कदम यांनी आपले शब्द मागे घेण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. रश्मी ठाकरेंबद्दल तसे बोलायला नको होते, मी माझे शब्द मागे घेतो. मी अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा दावा रामदास कदम यांनी केला. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत, त्याआधीच रामदास कदमांनी एक पाऊल मागे घेतल्याचे दिसते.

“मी जे वास्तव आहे, तेच बोललो. ठाकरेंचा अपमान होईल, असे काहीही बोललो नाही. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.

सुषमा अंधारे कोण? मी ओळखत नाही, तसेच आंदोलनांनाही घाबरत नाही. तीन वर्षे माझे तोंड बंद केले, माझ्या मुलाला त्रास दिला, आमचा गुन्हा काय?” असा सवालही रामदास कदम यांनी विचारला.

“उद्धव ठाकरे हे वारंवार मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे सांगत असतात. अरे पण ही गोष्ट किती वेळा सांगायची. तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र नाहीत, असे आम्ही म्हटले आहे का? मग तुम्हाला हे वारंवार का सांगावे लागत आहे? तुमच्यात स्वत:मध्ये काही कर्तृत्व आहे की नाही? असा सवाल रामदास कदम यांनी दापोलीतील एका कार्यक्रमात केला होता.

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात गेले आहेत. इतर वेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या,” असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता.

कदमांच्या या वक्तव्यानंतर काही ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी त्यांच्याविरोधात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली आहे. शिवसेना नेत्यांकडून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in