तेलंगणाच्या बीआरएसचे महाराष्ट्राकडे लक्ष; हे माजी आमदार करणार पक्षात प्रवेश

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे नांदेडमध्ये मेळावा घेणार असून बीआरएसच्या आजी माजी मंत्र्यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरु असल्याची चर्चा
तेलंगणाच्या बीआरएसचे महाराष्ट्राकडे लक्ष; हे माजी आमदार करणार पक्षात प्रवेश

महाराष्ट्रामध्ये आता तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (बीआरएस) मोर्चेबांधणी सुरु केल्याची चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसमध्ये गडचिरोलीमधील अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम हे पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये बीआरएसची सभा होणार असून तिथे त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होऊ शकते. त्यामुळे आता बीआरएस पक्षही महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होत आहे.

मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर भारत राष्ट्र समिती नाव ठेवण्यात आले. भविष्यामध्ये पक्ष विस्ताराच्या दृष्टीने बीआरएस पक्षाकडून महाराष्ट्रही काही जागा लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. अशामध्ये गडचिरोलीतील अहेरी विधानसभेचे माजी आमदार दीपक आत्राम येत्या नांदेडमधील सभेत मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री के. सी. राव यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, अहेरी विधानसभेतील बराचसा भाग हा तेलंगणाच्या सीमेला लागून असल्यामुळे त्या भागात तेलगू भाषिकांची संख्या अधिक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in