
राजापूरमधील बारसूमध्ये रिफायनरीवरून मोठा वाद पाहायला मिळाला आहे. प्रकल्पाच्या परीक्षणाला गावकऱ्यांनी विरोध केला. तर, काल आंदोलक महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांना पोलीस बळाचा वापर करत हा विरोध मोडून काढला. तसेच, परीक्षणाचे काम सुरु केले. यावेळी त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना महिलांही ताब्यात घेतले असून तब्बल १००हुंडा अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या गावाला भेट देऊन पाहणी केली.
यानंतर खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "भूमिपुत्रांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांची छावणी उभी केली. कोकणी माणसाचा आवाज दाबण्यासाठी बनवलेली छावणी, लाठ्या-काठ्या आम्ही पाहिल्या. राज्यभरातून याठिकाणी पोलीस आणले असून हे नेमके कोणासाठी सुरु आहे? हे विरोध करणारे याठिकाणचे भूमिपुत्र नाहीत का?" असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, "मंत्री, प्रशासन येथील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याचे काम करत असून त्यांना केवळ कोणत्याही परिस्थितीत रिफायनरीचा गाडा पुढे रेटायचा आहे. यासाठीच ही दडपशाही सुरू आहे. बारसूमध्ये शस्त्रसज्ज पोलीसफाटा आम्ही पाहिला. तसेच इकडे पत्रकाराच्या मानगुटीला धरून बाहेर काढण्यात आले. यांची फक्त हुकूमशाही सुरु आहे." असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.