आमदारांचा विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार राडा, हाणामारीपर्यत पोहचले आमदार

५० खोके, एकदम ओक्के ही घोषणा इतकी गाजली की ते संतापल्यासारखे झाले. त्यामुळे काही आमदार आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आले
आमदारांचा विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार राडा, हाणामारीपर्यत पोहचले आमदार

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे चित्र दिसले. सभागृह सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांवर धावून गेले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात बाचाबाची झाल्याचे सर्व माध्यमांनी समोर आणले. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी संकटात आहे. अनेक प्रश्न राज्यासमोर आहेत. त्याचवेळी लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या लोकप्रतिनिधींनी केलेली अशी कृती निश्चितच लाजिरवाणी असल्याचे बोलले जात आहे.

सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात विधानभवनाच्या पायऱ्यांवर हाणामारी झाली. सत्ताधारी आमदारांकडून आपल्याला धमकावल्याचेही मिटकरी यांनी म्हटले आहे. गोंधळाच्या वेळी उपस्थित असलेले शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आता आम्ही पायऱ्यांवर आंदोलन केले. गदारोळ सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ५० खोके, एकदम ओक्के ही घोषणा इतकी गाजली की ते संतापल्यासारखे झाले. त्यामुळे त्यांचे काही आमदार आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आले. त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा मनावर असल्याचे त्यांच्या वागण्यावरून दिसून येत असल्याचे अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in