फुटीरांचा व्हीप नामंजूर केला आहे, त्यामुळे माझ्याच पक्षाचा व्हीप चालेल - उद्धव ठाकरे

आताच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे
फुटीरांचा व्हीप नामंजूर केला आहे, त्यामुळे माझ्याच पक्षाचा व्हीप चालेल - उद्धव ठाकरे
Published on

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने सत्तेसाठी हपापलेल्या लोकांच्या राजकारणाची चिरफाड केली आहे. राज्यपाल या एकेकाळी आदरयुक्त असलेल्या यंत्रणेचे शासनकर्त्यांनी काढलेले धिंडवडेही स्पष्ट झाले आहेत. यापुढे राज्यपाल ही यंत्रणाच ठेवायची किंवा नाही, याचाही निकाल लागला पाहिजे. ज्यांना सगळे दिले अशा विश्वासघातकी लोकांनी माझ्याविरोधात विश्वासदर्शक ठराव आणणे मला कदापि मंजूर नव्हते. म्हणून मी नैतिकतेला स्मरून राजीनामा दिला. आताच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमच्याच पक्षाच्या व्हीपला मान्यता दिली आहे. फुटीरांचा व्हीप नामंजूर केला आहे. त्यामुळे माझ्याच पक्षाचा व्हीप चालेल असेही ते म्हणाले.

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. न्यायालयाच्या निकालाने एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या लोकांच्या राजकारणाची चिरफाड झाल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपालांची भूमिका अयोग्यच होती. त्या भूमिकेचेही वस्त्रहरण झाले. राज्यपाल ही यंत्रणा आतापर्यंत आदरयुक्त असायची. पण या यंत्रणेचे धिंडवडे शासनकर्त्यांनी काढल्याचे दिसून आले. राज्यपाल ही यंत्रणा यापुढे अस्तित्वात ठेवायची की नाही, हे पण आता न्यायालयाकडे न्यावे लागेल. राज्यपाल जे करायचे ते करून गेले. पण अशांना शिक्षा काय, यावरही विचार करावा लागेल. आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपविला असला तरी पक्षादेश हा त्यावेळीच्या म्हणजेच आमच्या शिवसेना कडेच राहिल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. अध्यक्षांनी अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करू असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगानेही चौकटीतच काम केले पाहिजे. आयोग हा काही ब्रम्हदेव नाही. बाळासाहेबांनी काय आयोगाला विचारून शिवसेनेची स्थापना केली नव्हती. मतांच्या टक्केवारीनुसार पक्षांना नोंदणी देणे व निवडणुका घेणे हे आयोगाचे काम आहे. आमचे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण आयोग काढून घेऊ शकत नाही. यापुढे माझ्याच शिवसेनेचा व्हीप चालणार असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले.

logo
marathi.freepressjournal.in