विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याचे काम जोरात सुरू; कारवाईच्या आकडेवारीत तफावत?

विशाळगड येथे हिंदूप्रेमींनी अतिक्रमण हटाव मोहीम स्वतःच हातात घेतल्यानंतर या ठिकाणी हिंसक वळण लागले होते. परिणामी, प्रशासनाने याची गंभीर दखल घेत विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली.
विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याचे काम जोरात सुरू; कारवाईच्या आकडेवारीत तफावत?
Published on

कोल्हापूर : विशाळगड येथे हिंदूप्रेमींनी अतिक्रमण हटाव मोहीम स्वतःच हातात घेतल्यानंतर या ठिकाणी हिंसक वळण लागले होते. परिणामी, प्रशासनाने याची गंभीर दखल घेत विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली असून सोमवार व मंगळवारी अनेक अतिक्रमणे हटवण्यात आली. यावेळी अतिशय कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुपारी दीडच्या दरम्यान विशाळगडावर झालेल्या हिंसक प्रकाराची दखल घेत इंडिया आघाडीचे खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांनी येथे पाहणी करत तेथील हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. मुसलमान वाडीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयाची भेट घेताना शाहू महाराज यांनी थंडीत कुडकुडणाऱ्या एका चिमुकलीला आपले जॅकेट घालायला दिले. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, पोलीस व प्रशासनाने पत्रकारांना विशाळगडावर जाण्यापासून रोखले. यामुळे पत्रकारांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ पोलीस व पत्रकार यांच्यात शाब्दिक वादावादीदेखील झाली.

मंगळवारी दुपारपर्यत बारा अतिक्रमणे कडक बंदोबस्तात हटवण्यात आली. दुपारनंतर ग्रामपंचायतीच्या‌ कामगारांनी मुसलमानवाडी व पायथा परिसरात साफसफाई केली. आंदोलकांच्या हल्ल्यात मोडतोड केलेले सामान तेथील मार्गातून हटविण्यात आले. दरम्यान, विशाळगडसह परिसरात संचारबंदी लागू आहे.

कारवाईच्या आकडेवारीत तफावत

सोमवारी गडावरची १५ जणांची २५ अतिक्रमणे हटवली आहेत. मात्र, प्रशासनाकडून आकडेवारीत वाढ करून ही संख्या ७० अशी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही दिशाभूल करणारी आकडेवारी असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधीकडून बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in