
राज्यात पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. तीन दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक, नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरू असून पुणे, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे.