वर्षभरात १ हजार एसटी बसेस होणार सीएनजी

सद्यस्थितीत एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या १६ हजार बसेसपैकी ठाणे विभागात केवळ ५० बस सीएनजीच्या आहेत
वर्षभरात १ हजार एसटी बसेस होणार सीएनजी

एसटी महामंडळाकडून आर्थिक भार कमी करण्यासाठी डिझेलवर धावणाऱ्या १ हजार बस सीएनजीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून वर्षभरात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे डिझेलवरील खर्चाची बचत होत महामंडळाचा आर्थिक भार कमी होण्यास सहकार्य मिळणार आहे.

कोरोना विषाणूचे संकट आणि एसटी संप या तब्ब्ल अडीच वर्षांच्या कालावधीत एसटी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. परिणामी प्रवासी संख्या दुरावत एसटीचा महसूल पूर्णतः घटला. मात्र नव्या जोमाने एसटीने पुन्हा प्रवाशांचा विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली असून नुकतेच ७५ व्या वर्धापन दिनी इलेक्ट्रिक एसटी बस पुणे ते अहमदनगर मार्गावर महामंडळाकडून सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या १६ हजार बसेसपैकी ठाणे विभागात केवळ ५० बस सीएनजीच्या आहेत. लवकरच १४८ विजेवरील बस ताफ्यात दाखल होणार असून महामंडळाकडून डिझेलवर धावणाऱ्या बसेसवर होणारा खर्च टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या बस दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यातही नवीन बस न घेता सध्या धावत असलेल्या बसपैकी एक हजार बस या सीएनजीसाठी परिवर्तित केल्या जाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एका कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. दरम्यान, येत्या एका वर्षांत या बस परिवर्तित होणार असल्याची माहिती चन्ने यांनी दिली. यासाठी १४० कोटी रुपये खर्च येणार आहे.

अलीकडे डिझेलवर होणाऱ्या खर्चात वाढ

एसटी महामंडळाच्या एकुण खर्चापैकी डिझेलवर होणारा खर्च हा पूर्वी ३४ टक्के एवढा होता. सध्याच्या काळात हा खर्च ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. याचा फटका महामंडळाला बसत असून कोरोना आणि त्यानंतर संप यामुळे एसटी अद्यापही सुरळीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे महामंडळाचे प्रतिदिन मिळणारे उत्पन्न देखील अद्याप स्थिर झालेले नाही. ही बाब लक्षात घेत महामंडळाकडून इलेक्ट्रिक बसेस, सीएनजी परिवर्तित अशी सकारात्मक पावले उचलण्यात येत आहे.

सुरुवातीला याठिकाणी सीएनजी बसेस चालवण्याचे नियोजन

सीएनजी स्टेशन्स हे राज्यात सर्व ठिकाणी उपलब्ध नसल्याने मुंबई, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातच सुरुवातीच्या काळात सीएनजी बस चालवण्याचे नियोजन असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in