ई-स्कूटरच्या बॅटरीच्या स्फोटात चिमुरड्याचा मृत्यू

याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी ‘एडीआर’अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे
ई-स्कूटरच्या बॅटरीच्या स्फोटात चिमुरड्याचा मृत्यू

वसई पूर्व भागातील रामदास नगर येथे इलेक्टि्रक दुचाकीची बॅटरी चार्ज करत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात सात वर्षांच्या चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटामुळे घराला आग लागली अन‌् घरात झोपलेला शब्बीर शाहनवाझ अन्सारी त्यात गंभीरपणे भाजला; मात्र उपचारादरम्यान रुग्णालयात शब्बीरचा मृत्यू झाला. याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी ‘एडीआर’अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

वसई पूर्वेकडील रामदास नगर इथे राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी २३ सप्टेंबर रोजी रात्री २.३० वाजताच्या सुमारास आपल्या इलेक्िट्रक स्कूटरची बॅटरी आपल्याच घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती; मात्र पहाटे बॅटरीचा भीषण स्फोट झाला. हॉलमध्ये गाढ झोपेत असलेला शब्बीर आणि त्याची आई रुक्साना हे दोघे गंभीर जखमी झाले होते. शब्बीर हा ७० ते ८० टक्के भाजल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

शाहनवाझ म्हणाले की, “बॅटरी चार्ज होण्यासाठी कमीत कमी तीन ते चार तास लागतात. याचा अंदाज घेत, बॅटरी रात्रीच्या वेळी आपल्या घरातील हॉलमध्ये लावली होती. बॅटरी चार्ज करून झोपायला गेलो; मात्र अचानक पहाटे ५ वाजताच्या सुमारास मोठा आवाज ऐकू आला. मी झोपेतून उठून हॉलमध्ये आलो, तेव्हा हॉलला आग लागल्याचे दिसले. छताच्या पंख्याला आग लागली होती. मी ताबडतोब माझ्या मुलाला आणि आईला उचलून घराबाहेर काढले. मुलगा आगीत जास्त जळाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in