आता एकत्र मोर्चा! हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार

ज्य सरकारने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाविरोधात येत्या ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवर निघणाऱ्या मोर्चात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांची मनसे एकत्र सहभागी होणार असल्याचे स्पष्ट संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी दिले.
आता एकत्र मोर्चा! हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार
Published on

मुंबई : राज्य सरकारने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाविरोधात येत्या ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवर निघणाऱ्या मोर्चात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांची मनसे एकत्र सहभागी होणार असल्याचे स्पष्ट संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी दिले. गिरगाव चौपाटीवर सकाळी दहा वाजता मोर्चा काढायचा की अन्य कुठल्या वेळेला काढायचा याबाबत उभय पक्षांचे वरिष्ठ नेते चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. परंतु ‘एकत्रित मोर्चा एकच मोर्चा’ असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी ‘एक्स’वर पोस्ट केले आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानापासून काही मिनिटांच्या अंतरावर जिप्सी रेस्टॉरंटमध्ये मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची भेट झाली. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. एकाच विषयासाठी दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकत्रित मोर्चा काढावा, असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला. हा मोर्चा भव्यदिव्य झाला पाहिजे. यासाठी विद्यार्थी, पालक, कलाकार आणि सामान्य नागरिकांना कशाप्रकारे आवाहन करायचे, यासाठी आमची आजची भेट आहे. आम्ही प्रत्येकवेळी कॅमेऱ्यासमोर भेटतो असे नाही. आम्ही एरव्हीही एकमेकांना भेटत असतो, असे सरदेसाई म्हणाले.

५ जुलैच्या मोर्चाच्या नियोजनाची प्राथमिक चर्चा करण्यासाठी भेटलो. राजकीय युतीचा निर्णय दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. मुंबईत मोर्चा काढायला कोणीही बंदी घालू शकत नाही. मराठी माणसे एकत्र आली तर कोणाला आवडणार नाही, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

मराठी भाषा अनिवार्य

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात २०२५-२६ पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत १६ एप्रिल २०२५ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य केली होती. या निर्णयाचे शुद्धीपत्रक शासनाने १७ जून रोजी निर्गमित केले आहे. ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, ती भाषा त्यास तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल, तर हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छा दर्शविणाऱ्या विद्यार्थ्याची त्याच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० असणे आवश्यक राहील, अन्यथा त्या शाळेत त्या इयत्तेसाठी हिंदी ही तृतीय भाषा असेल. हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी उपरोक्तप्रमाणे विहित किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छा दर्शविल्यास, त्या भाषेच्या अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अथवा सदर भाषा ही ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येईल. सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिले आहे.

मराठी माणूस नेतृत्व करणार!

पहिलीपासून हिंदी सक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ५ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल, असे मनसे अध्यक्ष राज यांनी ‘एक्स’वर म्हटले होते.

सरकारचा यूटर्न

हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे, शिवसेनेसह विरोधक एकवटल्याने महायुती सरकारने यूटर्न घेत मराठी भाषा अनिवार्य असून हिंदीसह अन्य भाषा ऐच्छिक असणार, असे स्पष्टीकरण दिले आहे.

निमंत्रण आले तर विचार करू - विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही या आधीच मांडली आहे, जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल आणि दोन्ही भावांचे निमंत्रण आले तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in