महापालिका निवडणुकीत भाजपला अस्मान दाखवू - उद्धव ठाकरे

भाजपला गणपतीच्या मंडपातदेखील राजकारण दिसते, गणपती हा बुद्धिदाता आहे, त्याने सर्वांना बुद्धी द्यावी,” असे म्हणत अमित शहा यांना टोला लगावला
महापालिका निवडणुकीत भाजपला अस्मान दाखवू - उद्धव ठाकरे

“शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांनाच महापालिका निवडणुकीत अस्मान दाखवू,” असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. “दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. उलट आता मला बरे आहे. माझ्या तोंडावर मुख्यमंत्रिपदाचा मास्क नसल्याने मला मोकळेपणाने बोलता येणार आहे,” असे सांगतानाच, “भाजपला गणपतीच्या मंडपातदेखील राजकारण दिसते, गणपती हा बुद्धिदाता आहे, त्याने सर्वांना बुद्धी द्यावी,” असे म्हणत अमित शहा यांना टोला लगावला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारच्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेला जमीन दाखवायची भाषा केली होती. भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन-१५०’चे टार्गेटही त्यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना आता प्रत्युत्तर दिले आहे. मातोश्री येथे शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कर जाधव तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. “शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आपण योग्यवेळी प्रत्युत्तर देऊ,” असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला मुख्यमंत्रिपद हवे असते, तर मीदेखील आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. ममतादीदी मला चांगल्या ओळखतात, त्यांच्याकडे मला आमदारांना पाठवता आले असते; पण मी तसे केले नाही. आता जे आहेत, ते मूठभर असले तरी चालतील; पण ते निष्ठावंत हवेत. आता जे सोबत आहेत, ते कट्टर, कडवट शिवसैनिक उरले आहेत.” शिवसेना ही काही आपली खासगी मालमत्ता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा वाद आता पेटणार आहे. कारण शिंदे गटानेदेखील शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याची परवानगी मागितली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती उत्सव होऊ द्या, नंतर दसरा मेळाव्याचे पाहू, असे म्हटले आहे; मात्र आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in