छत्रपती संभाजीनगर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याची त्वरित नार्को चाचणी करावी, अशी मागणी सत्तारूढ शिवसेनेकडूनच सोमवारी करण्यात आली. लाचखोरीबाबत आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सचिन वाझे हा अविभक्त शिवसेनेचा नेता होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले होते. पक्ष संघटनेत वाझे याची उठबस होती. अनिल देशमुख गृहमंत्री असताना खात्याच्या बैठकांना वाझे हजर राहात होता आणि बैठकीतील माहिती उद्धव ठाकरे यांना देत होता, असा दावा शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केला.
सचिन वाझे जर नार्को चाचणीला तयार असेल तर चाचणी त्वरित झाली पाहिजे म्हणजे या प्रकरणातील सत्तारुढ शिवसेनेची मागणी सत्य उजेडात येईल. महाविकास आघाडी सत्तेवर असतानाच चांदीवाल आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला होता, असेही शिरसाट यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. अहवाल अनुकूल होता तर तो जाहीर करण्यात का आला नाही, असा सवालही त्यांनी केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या त्या प्रकरणात वाझे आरोपी आहे. त्याचप्रमाणे उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणीही वाझे याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद आहे.