
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या भाजपवृद्धात चांगल्याच आक्रमक दिसतात. मात्र, याच आक्रमकतेमुळे आता त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. भाजप आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करताना त्यांनी महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख केला. यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, तसेच उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारेंना समज द्यावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वारकरी किर्तनकार संजीवनी हिंगोलीकर म्हणाल्या की, "सुषमा अंधारेंनी संतांबाबत चिड आणणारी वक्तव्ये केल्याने सर्व वारकऱ्यांमध्ये संताप आहे. सुषमा अंधारे राजकीय फायद्यासाठी संताचा अपप्रचार करणे बंद करावे, अशी सर्व संतांची आणि वारकरी संप्रदायाची मागणी आहे. तर, त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर तात्काळ माफी मागावी. तसेच, सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी आक्रमक झाले असून उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना समज द्यावी." अशी मागणी यावेळी केली आहे.
दरम्यान, त्यांनी सर्व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली. त्या म्हणाल्या की, "मी कोणाच्याही श्रद्धे आड आलेले नाही. पण राजकीय सूडबुद्धीतूनच मला विरोध केला जातो आहे. मला विरोध करण्यामागे भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहेत. तरीही जर माझ्यामुळे संतांच्या, वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते." सुषमा अंधारे यांनी पैठणच्या सभेत टीका करताना, 'रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार.… आरे तुम्ही रेंड्यांना शिकवले रे! पण माणसांना कुठे शिकवले?' असे वक्तव्य केल्यानंतर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला.