लक्ष्मण हाकेंची प्रकृती पाहून वडेट्टीवार भावूक, थेट मुख्यमंत्र्यांना लावला फोन, म्हणाले...

लक्ष्मण हाके यांची खालावलेली तब्येत पाहून वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले.
लक्ष्मण हाकेंची प्रकृती पाहून वडेट्टीवार भावूक, थेट मुख्यमंत्र्यांना लावला फोन, म्हणाले...

जालना : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे जालन्यातील वडिगोद्री येथे आंदोलन करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस असून दोघांचीही तब्बेत खालावली आहे. आज काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दरम्यान लक्ष्मण हाके यांची खालावलेली तब्येत पाहून वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला आणि परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत हाकेंना तब्येतीची काळजी घ्यायला लावा, उद्या शिष्टमंडळ पाठवतो, असं आश्वासन दिलं.

ओबीसींच्या मागे उभे राहणे हे माझं कर्तव्य

विजय वडेट्टीवार म्हणाले की, "ओबीसींच्या मागे उभे राहणे हे माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सत्ता येते आणि जाते, पदाचा मी कधीच विचार केला नाही. हे छत्रपती शिवरायांचे, शाहू-फुले-आंबेडकरांचे राज्य आहे. या पुरोगामीत्वाला धक्का लावण्याचे काम 2014 साली सुरू झालं. सरकारचे शिष्टमंडळ उद्या येणार आहे. लक्ष्मण हाकेंना पूर्ण अभ्यास आहे. सगेसोयऱ्यांचा विषय न्यायालयात टिकणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय, मग त्याचा अध्यादेश कशाला काढताय. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दोन समाज एकमेकांविरोधात उभे राहिले असून सामाजिक सलोखा उद्ध्वस्त होत आहे."

विजय वडेट्टीवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन-

विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हाकेंना तब्येतीची काळजी घ्या, असं सांगितलं आहे. त्याचबरोबर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. उद्या सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी पाठवतोय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in