मुंबई : विधानसभा निवडणुकीत पाच ते सहा जागा आरपीआयला मिळाव्यात अशी अपेक्षा होती. मात्र धारावी आणि कलिना विधानसभा मतदारसंघ अशा दोन जागा देण्यात आल्या आहेत. यंदा कमी जागा देत असलो तरी एक मंत्री पद आणि विधान परिषद सदस्य देणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिले आहे. महायुती सत्तेत येताच दोन्ही आश्वासन पूर्ण करावीत, मंत्रीमंडळाच्या विस्तारावर भरोसा नाही, असा चिमटा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला काढला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगले मित्र आहेत. माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर रिंगणात आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांना पाठिंबा देण्यात आला आहे. अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.
उपोषण नको राजकारणात या!
मराठा समाजाला जागे करण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केले. मात्र उपोषण करून चालणार नाही, यासाठी पक्ष स्थापन करा आणि राजकारणात उतरा, असे आवाहन रामदास आठवले यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.