
मुंबई : गुंतवणुकीच्या नावाने दोन व्यावसायिकाची १ कोटी ८८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिनेश कपूरचंद्र पारेख या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याची पत्नी बबीता दिनेश पारेख ही सहआरोपी असून, तिला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. यातील तक्रारदार इमिटेशन ज्वेलरीचे व्यावसायिक असून, त्यांचा महेश राजदेव हा मित्र असून त्यांच्याच माध्यमातून त्यांची दिनेशशी ओळख झाली होती. काही महिन्यांत त्यांची मैत्री झाली होती. याचदरम्यान दिनेश व त्याची पत्नी बबिताने त्यांना त्यांच्या सोन्याच्या व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला केला होता. गुंतवणुक रक्कमेवर दोन टक्के कमिशन देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता; मात्र या दोघांकडून सतत आग्रह होत असल्याने त्यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. दिनेश आणि बबिताच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांच्याकडे दिड कोटी रुपयांचे पाच किलो सोन्याचे दागिने आणि ३८ लाख रुपयांची कॅश गुंतवणूक केली होती.