
मुंबई : आश्रय योजनेअंतर्गत डोंगरी उमरखाडी येथे पालिका सफाई कामगारांच्या वसाहतीशेजारी असलेल्या दोन इमारतींचा पुनर्विकास करावा लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधीच खर्चात वाढ झाली असून ६४७.५८ कोटींचा खर्च ७४०.६० कोटींवर गेला आहे.
दक्षिण मुंबईतील बी विभागात ६४, जेल रोड, डोंगरी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेंतर्गत पुनर्विकास होणार आहे. या प्रस्तावाला जुलै २०२१ मध्ये पालिकेने मंजुरी दिली आहे. शायोना कार्पोरेशन या कंपनीची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पात घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या सेवा सदनिकांच्या पुनर्विकासाचे आराखडे सादर केले असता त्याठिकाणी एकत्रित पुनर्विकास शक्य नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उत्तर बाजूकडील पाच मजली आणि पूर्वेकडील चार मजली अशा दोन इमारतींना या पुनर्विकासात समाविष्ट करावे, अशी सूचना विकास नियोजन विभागाच्या प्रमुख अभियंत्याने केली आहे.
बांधकामाचा कालावधी १२ महिन्यांनी वाढला
त्यानुसार या दोन इमारतींचा पुनर्विकासात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे क्षेत्रफळ वाढले असून, बिल्टअप क्षेत्र, पार्किंग, जिने, लिफ्ट, मोकळ्या जागा, आपत्कालीन जमण्याची जागा, पाण्याची टाकी, मीटर, सोसायटी कार्यालय यासह इतर बाबींचा समावेश करावा लागला आहे. बांधकाम वाढणार असल्याने बांधकामाचा कालावधी १२ महिन्यांनी वाढवून २४ महिन्यांऐवजी ३६ महिने असा करण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
२६०० घरे उपलब्ध होणार
वाढीव बाबींमुळे बांधकाम क्षेत्रफळ १ लाख ३२ हजार ९४९ चौरस मीटर होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. यामध्ये कामगारांसाठी ३०० चौरस फुटाच्या १९३१ सदनिका आणि अधिकाऱ्यांसाठी ६०० चौरस फुटाच्या ८९ सदनिका बांधल्या जाणार आहेत.