मुंबई : बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन ॲॅण्ड सर्जरी (बीएएमएस) च्या १०० जागा राज्यात रिक्त राहिल्या आहेत. एमबीबीएसनंतर बीएसएमएस हा विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रमावर दुसऱ्या क्रमांकावर असतो. गेल्यावर्षी बीएएमएसच्या सर्व जागा भरल्या होत्या.
आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. यंदा संस्था व जागा यांच्यात वाढ झाली आहे. १०५ आयुर्वेद महाविद्यालय, २२ सरकारी शाळा, ८३ खासगी रुग्णालये आहेत. त्यात ७ हजार जागा आहेत. २०२२-२३ ला ५४२९ जागा होत्या.
खासगी संस्थातील बीएएमएसच्या ९७ जागा रिक्त राहिल्या आहेत, तर तीन जागा सरकारी रुग्णालयातील आहेत.
नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीन या संस्थेने नवीन संस्थांना मान्यता देण्यास विलंब केला. त्यामुळे आयुर्वेद महाविद्यालयात जागा रिक्त राहिल्या आहेत, असा आरोप तज्ज्ञांनी केला. वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांना विलंबाने मान्यता यंदा मिळाल्या. त्यामुळे या जागा रिक्त राहिल्या, असे सीईटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदा ११ आयुर्वेद संस्थांना नोव्हेंबर २०२३ मध्ये मान्यता मिळाली. पण, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच सुरू होती. प्रवेशाची मुदत ३० नोव्हेंबरची होती. त्यानंतर काही संस्थांना मान्यता मिळाली.आयुष ॲॅडमिशन सेंट्रल कौन्सिलिंग कमिटीने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया मध्यवर्ती पद्धतीने राबवण्याचे आदेश दिले आहेत.