
मुंबई : पार्टटाईम नोकरीची ऑफर देत विविध टास्कसाठी सुमारे १३ लाख रुपये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका ४५ वर्षांच्या महिलेची फसवणूक करणाऱ्या दोन सायबर ठगांना चेन्नई येथून पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. रफिक मोहम्मद आणि उदय राजा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी सहा लाखांसह सात महागडे मोबाईल जप्त केले आहेत. विलेपार्ले येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेला काही महिन्यांपूर्वी पार्टटाइम नोकरीची ऑफर देत प्रीपेड टास्कद्वारे दोघांनी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. तिने विविध टास्कसाठी १३ लाख २६ हजाराची गुंतवणूक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर तिला कमिशनची रक्कम मिळाली नाही किंवा रक्कम परत करण्यास संबंधित सायबर ठगांनी नकार दिला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. शोधमोहीम सुरू असतानाच सायबर सेलच्या एका विशेष पथकाने चेन्नई येथे राहणाऱ्या उदय राजा आणि रफिक मोहम्मद या दोघांना अटक केली. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले.