ठाण्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश होणार

ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली
ठाण्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश होणार

ठाणे महानगरपालिकेच्या लगत असलेल्या १४ गावांचा अखेर नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी नगरविकास विभागामार्फत त्याबाबतची प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात आली. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारिवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२१ ते मे २०२२ कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे; मात्र ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याची कार्यवाही सुर असल्याने त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जारी  झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येईल. परिणामी, नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणांच्या निवडणुका घ्याव्या लागतील. निवडणुकीवर दुहेरी खर्च होईल, हे लक्षात घेऊन ठाणे तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in