दुचाकीस्वारांना नियमांचे पालन करण्यासाठी १५ दिवसांची मुदत

दुचाकीस्वारांना नियमांचे पालन करण्यासाठी १५ दिवसांची मुदत

रस्त्यावर वाहतूक करताना प्रशासनाने काही नियम आखून दिले आहेत. स्वतःसोबत इतरांच्या सुरक्षेसाठी त्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असले, तरी प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आखून दिलेल्या नियमांचे येत्या १५ दिवसांनंतरही पालन न केल्यास सक्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

मुंबईसह अन्य शहरात दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आलेली आहे; मात्र या नियमांना दुचाकीस्वारांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून दुचाकीस्वारांसह मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंड आणि तीन महिने परवाना (लायसन्स) निलंबित करण्याची तरतूद वाहतूक पोलिसांनी केली आहे.

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक असते; मात्र काही प्रवासी वाहतूक पोलीस दिसल्यावर घाईत हेल्मेट घालण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट घालणे टाळतात. बहुतांश दुचाकीस्वार नियमबाह्य फॅशनेबल हेल्मेट वापरतात. याबाबत वारंवार सूचना वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. आता मात्र वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या १५ दिवसानंतर ही अंमलबजावणी होणार असून यासंबंधी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

नियमांचे पालन न

केल्यास दंडात्मक कारवाई

* मोटारसायकलस्वार, तसेच त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे हे मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४(ड) अन्वये बंधनकारक आहे.

* हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवल्यास कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याची तरतूद आहे.

* मोटारसायकलस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट वापरावे अन्यथा १५ दिवसांनंतर अशा मोटारसायकलस्वारांच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीवरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in