मध्यान्ह भोजनात १६ विद्यार्थ्यांना विषबाधेची घटना; पालिकेच्या शाळेत घडला होता प्रकार

पालिकेच्या दादर येथील प्रयोगशाळेत आमटी भात मूग चणे वाटाणे याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले
मध्यान्ह भोजनात १६ विद्यार्थ्यांना विषबाधेची घटना; पालिकेच्या शाळेत घडला होता प्रकार

मुंबई : आमटी भात खाल्यानंतर १६ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोट दुखीचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर आमटी भाताचे नमुने पालिकेच्या दादर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. नमुन्याची तपासणी केली असता काही दोष नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पालिकेच्या प्रयोगशाळेतील प्राथमिक अहवाल आहे. त्यामुळे शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेस क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे; मात्र कुलाबा येथील शासकीय प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तो रिपोर्ट पुढील दोन ते तीन दिवसांत उपलब्ध होणार आहे. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे चित्र स्पष्ट होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चेंबूर आणिक गाव येथील पालिकेची मनपा हिंदी शाळा असून, १३ ऑक्टोबर रोजी शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात आमटी भात देण्यात आला. मध्यान्ह भोजनानंतर ३ विद्यार्थ्यांना उलटी, तर १३ विद्यार्थ्यांना मळमळ सुरू झाली. १६ विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजनानंतर त्रास होताच गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २४ तास देखरेखीखाली ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबरला घरी सोडण्यात आले; मात्र विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजनाचा पुरवठा करणाऱ्या शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेवर आरोप करण्यात आले. संस्थेकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या अन्नात काही दोष होता का याची तपासणी करण्यासाठी पालिकेच्या दादर येथील प्रयोगशाळेत मसूर आमटी भात, मूग, चणे, वाटाणे हे नमुने प्लास्टिक कंटेनरमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. मसूर आमटी भात, मूग, चणे वाटाणे या सॅपलची तपासणी केली असता काही दोष नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विषबाधेच्या प्रकारानंतर शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेचे काम थांबवण्यात आले होते; मात्र पालिकेच्या प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्याने संस्थेचे काम पुढे सुरू ठेवायचे का याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे.

शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात होणार उलगडा!

पालिकेच्या दादर येथील प्रयोगशाळेत आमटी भात मूग चणे वाटाणे याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पालिकेच्या प्रयोगशाळेचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून त्यात अन्नात दोष नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र कुलाबा येथील शासकीय प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होईल की विद्यार्थ्यांना नेमका कशामुळे त्रास झाला, विद्यार्थ्यांची तबेत बिघडली होती का, विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याआधी काही खाल्ले होते का हे स्पष्ट होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in