२० ते २५ आमदार मातोश्रीवर घरवापसी करणार ?

एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी वडोदरा येथे भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुप्त बैठक घेतली होती
२० ते २५ आमदार मातोश्रीवर घरवापसी करणार ?

शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षांतर विरोधी कायद्यानुसार ४६ आमदारांसह दोन तृतीयांश मताधिक्य असल्याचा दावा केला जात आहे. बंडखोरी केल्यानंतरही आपण शिवसेनेतच असल्याचा दावा या आमदारांकडून केला जात आहे; मात्र कायदेशीर लढाई लढायची असल्यास, या बंडखोर आमदारांना एकतर भाजपमध्ये किंवा अपक्ष आमदार बच्चू कडूंच्या पक्षात विलीन व्हावे लागणार आहे. या सर्व गोष्टींना बंडखोर आमदारांचा विरोध असल्याने त्यापैकीच २० ते २५ आमदार मातोश्रीवर घरवापसीसाठी मनधरणी करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी वडोदरा येथे भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुप्त बैठक घेतली होती. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपनेही हालचाली सुरू केल्या असून आता भाजपच्याही बैठकांना जोर आला आहे; मात्र सत्ता स्थापन करायची झाल्यास, बंडखोर आमदारांचा गट कायद्यात बसत नाही. बंडखोर आमदारांना त्यांचा गट राजकीय पक्षात विलीन करावा लागेल; मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून बंडखोर आमदारांमध्ये मतभेद आहेत. अपक्ष म्हणून सत्तेत सामील झाल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात. या मुद्द्यावरून आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समजते.

भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय बंडखोर आमदारांना पटत नसल्याने आम्ही शिवसैनिकच, शिवसेनेसोबतच अशी भूमिका घेणाऱ्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्यावरून २० ते २५ आमदारांमध्ये मतभेद असल्याने ते मातोश्रीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. वाढत्या मतभेदांमुळे एकनाथ शिंदेंच्या गटातील अनेक आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरेंशी बोलून मध्यस्थी करा, अशी गळ घालणारे अनेक फोन सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना येत आहेत. बंडखोरांपैकी १६ आमदार संपर्कात असल्याचा दावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीसुद्धा केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in