मुंबईत तब्बल २६९ अनधिकृत शाळा सुरू

मुंबईत तब्बल २६९ अनधिकृत शाळा सुरू

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. मात्र, शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडल्याचे चित्र मुंबईत दिसून येत आहे. मुंबई महापालिकेची मान्यता न घेता मुंबईत तब्बल २६९ अनधिकृत शाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत २६९ हून अधिक अनधिकृत शाळा आहेत. वारंवार नोटीस बजावूनही शाळा व्यवस्थापनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबईतील अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. मुंबईत नवीन शाळा सुरू करण्याआधी नियमानुसार पालिकेच्या शिक्षण विभागाची परवानगी बंधनकारक आहे. परंतु, मुंबईत २६९ अनधिकृत शाळा पालिकेच्या मान्यतेविना सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या अनधिकृत शाळा गेल्या १० वर्षांपासून सुरू आहेत. परंतु, या बेकायदा शाळांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील अनधिकृत शाळांना मुंबई महापालिका वारंवार नोटीस बजावते. नोटीस बजावण्यात आलेल्या शाळांची यादी दरवर्षी राज्य सरकारला सादर करण्यात येते. मात्र, अशा शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. नियमानुसार शाळांना मान्यता हवी असल्यास योग्य ती दंडाची रक्कम भरावी लागते. दंडाची रक्कम एक लाखांपर्यंत आकारण्यात येते. दंड भरण्यात आलेल्या शाळांनी सेल्फ फायनान्स विभागाचे पत्र पालिकेला सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर अटी, शर्तीची पूर्तता केलेल्या या अनधिकृत शाळांना नियमानुसार मान्यता देण्यात येते, असे पालिकेचे शिक्षण अधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे समायोजन

जवळच्या शाळेत करणार

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये मागील वर्षीच्या २८३ अनधिकृत शाळांपैकी एकूण ४ शाळांना राज्य सरकारचे स्वयंअर्थसहाय्य (सेल्फ फायनान्स) प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. ४ शाळांना ‘एनआय ओएस’ची मान्यता मिळालेली आहे. ११ शाळा बंद झाल्या आहेत. अनधिकृत शाळांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या एकूण १९ शाळा व नव्याने आढळलेल्या ५ शाळा अशा एकूण २६९ अनधिकृत शाळांची यादी तयार करण्यात आलेली आहे. दरम्यान, २६९ अनधिकृत शाळांना बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेत किंवा मान्यताप्राप्त शाळांमध्ये करण्यासाठी मार्च-२०२२ मध्ये सूचनापत्रे देण्यात आल्याचे तडवी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in