फ्लॅटच्या आमिषाने वयोवृद्धाची ३० लाखांची फसववणुक

बोरिवलीतील घटना; पिता-पूत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
फ्लॅटच्या आमिषाने वयोवृद्धाची ३० लाखांची फसववणुक

मुंबई : फ्लॅटच्या आमिषाने एका वयोवृद्धाची ३० लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिहीर अशोक जेठवा आणि अशोक जेठवा या पिता-पूत्र बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध एमएचबी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. बोरिवली परिसरात ७४ वर्षांचे तक्रारदार वयोवृद्ध त्यांच्या पत्नीसोबत राहतात. त्यांचा मुलगा विदेशात नोकरीला आहे तर ते स्वत दुबईत ऑटोमोबाईल मॅकेनिक म्हणून काम करत होते. सात वर्षांपूर्वी ते निवृत्त होऊन मुंबईत परतले होते. गुंतवणुक म्हणून त्यांना एक फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांना त्रिवेणी डेव्हलपर्सकडून बोरिवलीतील आयसी कॉलनी, न्यू मोनालिसा सोसायटीचे पुर्नविकासाचे काम सुरु असल्याची माहिती समजली होती. याच सोसायटीमध्ये त्यांचा मेहुणा राहत असल्याने त्यांनी तिथे फ्लॅट घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीचे मालक मिहीर जेठवा व त्याचे वडिल अशोक जेठवा यांची भेट घेतली होती. पुर्नविकास प्रकल्पाची सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यांना एक फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्‍वासन दिले होते. यावेळी त्यांनी फ्लॅटसाठी त्रिवेणी डेव्हलपर्स कंपनीच्या बँक खात्यात ४७ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्यांच्यात न्यू मोनालिसा इमारतीमध्ये फ्लॅट क्रमांक ६०१ साठी करार झाला होता. एप्रिल २०१९ साली हा प्रकल्प त्यांच्या कंपनीकडून काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी त्यांना दोन लाखांचा धनादेश दिला आणि ४५ लाखांचे नऊ पोस्ट डेटेड धनादेश दिले होते. मात्र त्यांनी दिलेले सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना १८ लाख ५० हजार रुपये एनईएफटीद्वारे दिले होते. मात्र उर्वरित ३० लाख ५० हजाराचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यांचे बँक खाते गोठविण्यात आले होते, कार्यालयाला टाळे लावण्यात आले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मिहीर आणि अशोक जेठवा यांच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in