मालाड सांडपाणी केंद्रासाठी ४८ कोटींचा सल्ला! सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू अन् आता सल्लागाराची नियुक्ती

सन २०२० मध्ये मागवलेल्या निविदा प्रक्रियेत टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली होती
मालाड सांडपाणी केंद्रासाठी ४८ कोटींचा सल्ला!
सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू अन् आता सल्लागाराची नियुक्ती
Published on

मुंबई : समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने सात सांडपाणी प्रकल्प हाती घेतले आहेत. सात प्रकल्पांपैकी मालाड येथील प्रकल्पाचे काम सुरू होऊन १५ महिने उलटले आणि आता कामाचा सल्ला घेण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून, सल्लगाराला तब्बल ४७.४८ कोटी रुपये पालिका मोजणार आहे.

सांडपाण्यामुळे समुद्री जीवाला धोका आणि समुद्रातील वाढते प्रदूषण यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने आधुनिक पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या बाबत स्पष्ट निर्देश दिल्यानंतर पालिकेने २००२ साली मुंबई मलनिःसारण प्रकल्प टप्पा - २ चा सुसध्यता अभ्यास पूर्ण करून मलनिःसारण प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासह सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी शहर आणि उपनगरात सात ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी मालाड केंद्राचे काम जुलै २०२२ पासून सुरू झाले आहे. दररोज ४५४ दशलक्ष लिटर क्षमतेचा हा प्रकल्प असून, त्यासाठी सीसी लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार सेवा नियुक्त करण्यासाठी सन २०१९ ते २०२३ दरम्यान एकूण चार वेळा निविदा मागवण्यात आल्या. त्यापैकी तीन वेळा तांत्रिक वा प्रशासकीय कारणामुळे निविदा रद्द करण्यात आल्या.

कंत्राटदाराच्या सादरीकरणात त्रुटी

सन २०२० मध्ये मागवलेल्या निविदा प्रक्रियेत टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली होती. कंपनीने ४२.५० कोटी रुपयांची बोली लावून काम मिळवले होते; मात्र या कंपनीची आधीच तीन प्रकल्पांच्या कामांमध्ये सल्लागार सेवा घेतली जात असल्याने दुसऱ्या क्रमांकावरील कंपनीची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र कायदेशीर बाबींमध्ये ही बाब बसत नसल्याने ही निविदा रद्द करून जानेवारी २०२३मध्ये पुन्हा निविदा मागविण्यात आली. यामध्ये आयएलएफ कंन्सल्टिंग इंजिनिअर्सने ३९ कोटी ३५ लाखांची बोली लावली. कंत्राटदाराच्या सादरीकरणात त्रुटी आढळून आल्याने पालिकेच्या विधी विभागाच्या सल्ल्यानुसार ही निविदा देखील रद्द करण्यात आली.

२१.८७ टक्के कमी रकमेची बोली!

यंदाच्या १४ जुलै रोजी पुन्हा निविदा मागविण्यात आली. त्यात स्टूप कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ३३.८९ कोटी रुपयांची बोली लावली होती. पालिकेचा कार्यालयीन अंदाज ४३ कोटी ३८ लाख रुपये इतका होता. या अंदाजापेक्षा २१.८७ टक्के कमी रकमेची ही बोली लावण्यात आली होती. विविध करांसह ४७.७८ कोटी रुपयांचे कंत्राट या कामासाठी देण्यात आले असून, या प्रस्तावाला पालिका प्रशासनानेही हिरवा कंदील दाखवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in