
मुंबई : दहिहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ सुरू होती. अनेक गोविंदा पथकांनी ८ , ९ थर उभारत सलामी दिली. उंच उंच थर उभारत मटकी फोडताना मानवी थर कोसळले आणि या घटनेत गुरुवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७७ गोविंदा जखमी झाले असून, त्यांना पालिकेच्या विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी १८ जखमी गोविंदांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर ७ जखमी गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, उर्वरित ५२ जखमींवर ओपीडीत उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरा जखमींच्या संख्येत वाढ झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गुरुवार ७ सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यात दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दहिहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी सकाळपासून मुंबईसह ठाण्यात कुच केली. मुंबईतही उंच उंच थर लावून मटकी फोडण्यासाठी गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मटकी फोडताना मानवी थर कोसळल्याने अनेक गोविंदा जखमी झाले. मुंबईत ... गोविंदा जखमी झाले. जखमी गोविंदांना उपचारासाठी पालिकेसह सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७७ जखमी गोविदांपैकी १८ गोविंदांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. तर ७ गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले.
'या' रुग्णालयात दाखल
केईएम रुग्णालय - २६
सायन रुग्णालय - ७
नायर रुग्णालय - ३
जे.जे. रुग्णालय - ४
जीटी रुग्णालय - २
पोद्दार रुग्णालय - ४
राजावाडी - ८
शताब्दी रुग्णालय - २
वांद्रे भाभा रुग्णालय - ७
ट्राॅमा केअर रुग्णालय - ४
व्ही एन देसाई रुग्णालय - २
कूपर रुग्णालय - ४
बाॅम्बे रुग्णालय - १
सेंट जॉर्ज रुग्णालय - १