उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ९ महिन्यात ८६ सरकते जिने बसवणार

या सुविधेमुळे गरोदर महिला, ज्येष्ठ प्रवाशांना स्थानकातून झटपट बाहेर पडणे आणि पोहोचणे शक्य होणार आहे
उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ९ महिन्यात ८६ सरकते जिने बसवणार

प्रवाशांच्या सोईस्कर प्रवासासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील काही स्थानकांमध्ये नवे सरकते जिने बसवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासोबत काही स्थानकांमधील सरकत्या जिन्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे गरोदर महिला, ज्येष्ठ प्रवाशांना स्थानकातून झटपट बाहेर पडणे आणि पोहोचणे शक्य होणार आहे. दरम्यान, मार्च २०२३ पर्यंत आणखी ८६ सरकत्या जिन्यांची भर पडणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे. मधल्या काळात स्थानकातील गर्दी विभाजनासाठी नव्या पादचारी पुलांची भर रेल्वे प्रशासनाकडून टाकण्यात आली. मात्र तरी रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात आणि ज्येष्ठ, गरोदर महिलांना पादचारी पुलावर चढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने स्थानकात नवे सरकते जिने आणि उद्वाहक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक सरकते जिने मध्य रेल्वेवर बसवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रत्येक सरकत्या जिन्यांची किंमत सुमारे एक कोटी रुपये एवढी असून रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला स्थानकांमध्ये १०१ सरकते जिने बसवण्याची मंजुरी देऊ केली आहे. त्यानुसार मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमध्ये १०१ पैकी ३३ जिने बसवण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे

सध्या - ८६ सरकते जिने

नवीन - १८ सरकते जिने (मार्च २०२३ पर्यंत)

मध्य रेल्वे

सध्या - १०९ सरकते जिने

नवीन - ६८ सरकते जिने (मार्च २०२३ पर्यंत)

उपनगरीय रेल्वेवरील या स्थानकांमध्ये बसवणार सरकते जिने

मध्य रेल्वेवरील कांजुरमार्ग, ठाकुर्ली, भायखळा, मुलुंड, मुंब्रा आणि इगतपुरी (प्रत्येकी दोन जिने) आणि आंबिवली (एक) तर पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, वांद्रे टर्मिनस, सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर, वसई रोड, सफाळे, वानगाव स्थानकात सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in