
लग्नास नकार दिला म्हणून भरस्त्यात एका २५ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच प्रियकराने चाकूहल्ला केल्याची घटना वडाळा परिसरात घडली. या तरुणीला वाचवताना पोलीस शिपाई मयूर बंडू पाटील हेसुद्धा जखमी झाले आहेत. जखमी तरुणीवर केईएम तर मयुर पाटील यांच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी हल्ला करणाऱ्या अनिल उत्तम बाबर याला वडाळा पोलिसांनी अटक केली असून त्याला गुरुवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांनी सांगितले. ही घटना बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजता वडाळा येथील बरकतअली रोडवर घडली. २५ वर्षांच्या तरुणीसोबत अनिलचे प्रेमसंबंध होते. पण काही कारणामुळे त्यात दुरावा निर्माण झाला होता. तिने लग्नाला स्पष्टपणे नकार दिल्याचा राग मनात धरून तिची हत्या करण्याच्या उद्देशाने तो बुधवारी सकाळी बरकतअली रोडवर आला होता.
ही तरुणी कामावर जात असताना त्याने तिच्यावर अचानक चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात ती जखमी झाली. हा प्रकार गस्तीवर असलेल्या मयुर पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जीवाची पर्वा न करता अनिलला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने त्यांच्यावरही चाकूने प्राणघातक हल्ला केला.