डेड बॉडी बॅग प्रकरणात किशोर पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल

ईडी अॅक्शन मोडवर; पेडणेकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चौकशी होणार
डेड बॉडी बॅग प्रकरणात किशोर पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आल्याने हा गुन्हा दाखल झाला असून, लवकरच किशोरी पेडणेकर यांच्यसह इतर मनपा अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.

आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडीने गुन्हा केल्यामुळे किशोर पेडणेकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. कोरोना काळात महानगरपालिकेने विविध चार कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणेत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत मनपाने कोरोना काळात कोव्हीड केंद्र उभारणे, विविध औषधांसह साहित्य खरेदी, डॉक्टर पुरवठा आदीमध्ये भष्ट्राचार झाल्याचे नमूद केले होते. कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने बॉडी बॅगेची खरेदी केली होती. या बॅगेची वाढीव किंमत लावून भष्ट्राचार झाल्याचा आरोप झाला होता. मृत कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने काही बॉडी बॅग खरेदी केले होते. त्याची किंमत दिड ते दोन हजार रुपये असताना ते बॅग सहा हजार आठशे रुपयांना घेण्यात आले होते असा ईडीच्या तपासात उघडकीस आले होते. हे कंत्राट माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनंतर देण्यात आले होते. त्या नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत मुंबईच्या महापौर म्हणून कार्यरत होत्या. या कालावधीत त्यांनी बॉडी बॅग खरेदीचे आदेश दिले होते. त्यानंतर अतिरिक्त पालिका आयुक्त आणि उपायुक्त यांच्या कार्यालयातून विविध कोव्हीड वैद्यकीय उपकरणे, साहित्य, औषधे, ऑक्सिजन, बॉडी बॅग आणि इतर साहित्य खरेदी करण्यात आले होते. जुलै महिन्यात आलेल्या या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याची चौकशी सुरू केली होती.

तपासात बॉडी बॅग खरेदी व्यवहारात भष्ट्राचार झाल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी ४२०, १२० ब, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. पालिकेचे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण खाते भायखळा परिसरात येत असल्याने त्याची तक्रार आग्रीपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच त्याचे कागदपत्रे ईडीकडून मागविण्यात आले होते. या कागदपत्रांची ईडीकडून शहानिशा सुरू होती. प्राथमिक तपासात या संपूर्ण घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात मनी लॉड्रिंग झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे किशोरी पेडणेकरसह इतर मनपा अधिकाऱ्यांविरुद्ध ईडीने आता दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत लवकच संबंधितांची चौकशी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in