
मुंबई : क्रेडिट कार्डवरुन ऑनलाईन व्यवहार करुन एका हॉटेल व्यावसायिकाची ५ लाख ३२ हजाराची फसवणुक झाल्याचा प्रकार जुहू परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्रविण बाळासाहेब गाडेकर हे त्यांच्या कुटुंबियांसोबत दादर परिसरात राहतात. जुहू परिसरात नोव्होटेल नावाचे एक नामांकित हॉटेल असून याच हॉटेलमध्ये ते सिक्युरिटी मॅनेजर म्हणून काम करतात. हॉटेलचे ामलक रविश नरेश खन्ना असून ते मूळचे दिल्लीचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे अमेरिकन एक्सप्रेसचे एक क्रेडिट कार्ड आहे. या कार्डचा ते त्यांच्या दैनदिन कामासाठी वापर करतात. जुलै महिन्यांत त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट प्राप्त झाले होते. त्यांच्याकडे त्यांचे क्रेडिट कार्ड असताना ८ जून ते ४ जुलै या कालावधीत त्यांच्या कार्डवरुन पाच ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारातून त्यांच्या कार्डवरुन ५ लाख ३२ हजाराचे ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे डेबीट झाले होते. हा प्रकार रविश खन्ना यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बाहेगरगावी असल्याने प्रविण गाडेकर यांना त्यांच्या वतीने जुहू पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणूकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नेांदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास जुहूच्या सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.