
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलवर झळकल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्हायरल व्हिडिओप्रकरणी अखेर पूर्व प्रादेशिक सायबर विभागाने लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार आणि ज्योतिषी अनिल थत्ते यांच्याविरुद्ध भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला असून या कथित आक्षेपार्ह व्हिडीओची पोलिसांकडून सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे.
१७ जुलैला लोकशाही चॅनेलने किरीट सोमय्या यांचा एक अश्लील आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. या व्हिडीओमुळे किरीट सोमय्या हे चांगलेच अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांशी फारसे न बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवसीस यांना व्हिडीओची सत्यता पडताळून पाहून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यातच विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ करून सोमय्याविरुद्ध घोषणाबाजी केली होती. त्यामुळे देवेंद्र फडवणीस यांनी या अश्लील व्हिडीओ व्हायरलची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी या व्हिडीओ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला होता.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेसह तांत्रिक तंत्रज्ञ, सायबर सेल अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली होती. या व्हिडीओ व्हायरलप्रकरणी किरीट सोमय्या यांनी लेखी तक्रारअर्ज दिला होता. या अर्जानंतर मंगळवारी त्यांना जबानी देण्यासाठी सायबर सेल विभागात बोलाविण्यात आले होते. त्यांच्या जबानीनंतर पूर्व प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी संपादक कमलेश सुतार, ज्योतिषी अनिल थत्ते यांच्याविरुद्ध मानहानीच्या भादवी कलम ५०० यासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. यापूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कमलेश सुतार यांच्यासह चॅनेलच्या इतर सहकाऱ्यांची चौकशी करून जबानी नोंदवून घेतली होती. यावेळी या व्हिडीओसह इतर तांत्रिक पुरावे ताब्यात घेण्यात आले होते. ते सर्व पुरावे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
व्हिडियो खरा की मॉर्फ याचा तपास सुरू
किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ खरा आहे की मॉर्फ केलेला आहे याचा तपास सुरु असून व्हिडीओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली आहे. सोमय्या यांचे असे इतर ३० ते ३५ व्हिडिओ असून ते कुणाकडे आहेत तसेच संबंधित व्यक्तीकडून ते सर्व व्हिडीओ ताब्यात घेण्यात येणार आहे. या संपूर्ण व्हिडीओची सत्यता पडताळून समोरील महिला कोण, त्यांचे किरीट सोमय्याशी काय संबंध होते. त्यांच्यातील व्हिडीओ चॅट केव्हा, कधी आणि किती वेळा झाले, याचा आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तपासानंतर त्याचा अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.