मुंबई : धावत्या लोकलमध्ये एका २० वर्षांच्या तरुणीला शिवीगाळ करुन मारहाणीसह विनयभंग व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नवाजू करीम शेख या आरोपीविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी १२० पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात भक्कम पुरावे सादर करून आरोपीला जास्तीत जास्त मिळावी यासाठी रेल्वे पोलिसांनी प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात आले. २० वर्षांची ही तरुणी १४ जूनला सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी वाशी येथे कॉलेजला परिक्षा देण्यासाठी जात होती. सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सुटणार्या एका लोकलच्या महिलांच्या डब्ब्यात प्रवास करताना अचानक एक व्यक्ती या डब्ब्यात शिरला. डब्ब्यात कोणीही नसल्याची संधी साधून या व्यक्तीने तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडआोरड केल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. तिच्याशी लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. मशिदबंदर रेल्वे स्थानक येताच आरोपी चालत्या लोकलमधून पळून गेला होता. या प्रकाराने ही तरुणी प्रचंड घाबरली होती. काही रेल्वे प्रवाशांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी ही रेल्वे कंट्रोलला ही माहिती दिली. ही माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच एक विशेष पथक तिच्या वाशी येथील कॉलेजमध्ये गेले होते. तिथेच या तरुणीची जबानी नोंदविण्यात आली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३७६ (एक), ३५४, ५०९, ५०४, ३२३ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासांत पोलिसांनी पळून गेलेल्या नवाजू शेखला अटक केली.