
मुंबई : दरोड्यापूर्वीच चारजणांच्या एका टोळीला घातक शस्त्रांसह गोरेगाव पोलिसांनी अटक केली. तर त्यांचे दोन सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सुरज शंकर डोले, कृष्णा संतोष सुरवाडे, शोएब अब्दुल कादीर खान आणि सुंदर शिवशंकर यादव अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी लोखंडी कटावणी, रॉड, कोयता, चाकू, चिकटपट्टी, दोरखंड, स्क्रु ड्राव्हर आदी घातक शस्त्रांसह दरोड्याचे साहित्य जप्त केले आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव येथे कुंदन नावाचे एक ज्वेलर्स दुकान असून, येथे काही सराईत गुन्हेगार दरोड्यासाठी येणार असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा तिथे पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री दोन वाजता तिथे सहाजण आले होते. ते सर्वजण कुंदन ज्वेलर्समध्ये दरोड्याबाबत एकमेकांना सांगत होते. त्यांची हालचाल संशय वाटताच पोलिसांनी त्यांना शरण येण्यास सांगितले; मात्र साध्या वेशातील पोलिसांना पाहताच ते सर्वजण पळू लागले. यावेळी सहापैकी चौघांना घटनास्थळाहून अटक केली.