संवेदनशील स्त्रीच्या फुलणाऱ्या भावनांचे चित्रप्रदर्शनाद्वारे सादरीकरण

१६ ऑगस्टपासून मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रकार संगीता कुमार मूर्ती यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
संवेदनशील स्त्रीच्या फुलणाऱ्या भावनांचे चित्रप्रदर्शनाद्वारे सादरीकरण

निसर्गाच्या सहवासात संवेदनशील स्त्रीच्या फुलणाऱ्या भावना आणि त्यांचे विविध पैलू दर्शवणारे एकल चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध चित्रकार संगीता कुमार मूर्ती यांच्या कलाकृती असलेले हे प्रदर्शन १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य बघता येणार आहे. या प्रदर्शनात त्यांनी पेन व इंक वापरून कागदावर व ऍक्रिलिक रंग वापरून कॅनव्हासवर चित्रे तयार केली आहेत.

या प्रदर्शनात रंगलेपनातील कुशलता दर्शविताना चित्रकार संगीता मूर्ती यांनी स्पष्ट रेषा, विविध आकार व भूमितीय रूपे आणि तत्सम प्रतिकांचा कलात्मक वापर केला आहे. त्यात संकल्पना, फॅब्रिक्समधील पोत व त्यासोबत इतर प्रतिकात्मक संकल्पनांचा कलात्मक समन्वय ठळकपणे दिसतो. त्यांच्या चित्रात प्रामुख्याने 'आत्मा' 'समन्वय', 'बहर' व 'उन्मुक्त प्रकटीकरण' ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे मानवी अस्तित्वाचे मूळ व त्याची यथार्थता दर्शविताना त्यांनी चित्रातून मांडलेले आपले विचार, संकल्पना, रचनात्मक संबोधने व तत्सम प्रतिके वाखाणण्याजोगे आहेत. स्त्रीच्या विविध वेषभूषांतून आणि भावविश्वातून साकारणारे भावनिक वैविध्य आणि आजच्या प्रगत समाजात तिची आशा/आकांक्षा, जिद्द व सकारात्मक दृष्टिकोन ह्यावर आधारित अपेक्षित असणारी उत्तरोत्तर वाटचाल आणि प्रगती ह्यांचा चित्रातून एक वेगळा विचार त्यांनी मांडला आहे. ग्रे आणि सेपिया रंग व अन्य रंगसंगतीचा व तंत्रशुद्ध साधनांचा आणि शैलीचा वापर करून साकारलेली चित्रे खरोखर स्त्रीच्या भावविश्वातील अनेक पैलू आणि त्यांची निसर्गसान्निध्यात बहरलेली विविधांगी रूपे फार आकर्षकरीतीने दर्शवितात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in