
भिवंडी : शहरातील एका ३२ वर्षीय जुन्या इमारतीची भिंत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी दुपारच्या सुमारास नारपोली परिसरात घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर अल्प प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दरम्यान, या इमारतीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव सुदैवाने वाचला आहे. त्यामुळे वर्धमान सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची १ गाडी पाचारण करण्यात आली होती. नारपोली हद्दीतील रतन सिनेमा समोरील विठ्ठल नगर परिसरातील खैरूनिसा सिद्दीकी यांच्या मालकीच्या ३२ वर्षीय दुमजली इमारतीच्या तळ मजल्यावरील पाठीमागच्या बाजूची भिंत सोमवारी शाळा सुरू असताना पहिल्या मजल्यावरील भिंत नजीकच्या गल्लीत कोसळली. दरम्यान, दुर्घटनेनंतर काही विद्यार्थ्यांना स्थानिकांनी इमारतीमधून सुरक्षित बाहेर काढल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली. महापालिका प्रशासनाने या इमारतीला धोकादायक घोषित करूनही इमारतीवर तोडक कारवाई का केली नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.