पालिकेच्या २४ वॉर्डात निवारा केंद्र बेघरांना राहण्याचा आसरा देण्यासाठी सामाजिक संस्था, बॅकांना साद

मुंबईत १२५ शेल्टर होम पालिकेला तयार करावे लागतील
पालिकेच्या २४ वॉर्डात निवारा केंद्र बेघरांना राहण्याचा आसरा देण्यासाठी सामाजिक संस्था, बॅकांना साद

मुंबई : मुंबईतील बेघरांना राहण्याचा आसरा मिळावा यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात निवारा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. निवारा केंद्र चालवण्यासाठी सामाजिक संस्था, बॅक, कार्पोरेट क्षेत्र, उद्योजक, उद्योग समूह यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या नियोजन विभागाने केले आहे.

मुंबईत ४७ हजारांच्या घरात बेघर नागरिक असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. बेघरांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. बेघर नागरिकांची पावसाळ्यात व हिवाळ्यात गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने निवारा केंद्र सुरू केले आहेत. या नागरिकांना राहण्यासाठी पालिकेची लहान मुलांची ११ आणि प्रौढांसाठी १५ शेल्टर होम आहेत. बेघरांच्या संख्येच्या तुलनेत ती कमी आहेत. त्यामुळे मुंबईत रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, मोकळ्या जागांवर हजारो बेघर नागरिकांनी आपले बस्तान मांडले आहे. २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहराच्या १ लाख लोकसंख्येमागे १ निवारागृह (शेल्टर होम) बेघरांसाठी बांधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत १२५ शेल्टर होम पालिकेला तयार करावे लागतील. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संस्थांच्या रेट्यानंतर शेल्टर होमची संख्या वाढविण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला असला तरी त्यास यश मिळालेले नाही.

जागांच्या मागणीस प्रतिसाद नाही

एमएमआरडीए, एसआरए, एमएसआरडीसी, बीपीटी, म्हाडा अशा विविध सरकारी यंत्रणांकडे जागांची मागणी केली आहे. मात्र त्यास अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे नवीन प्रयत्नांनुसार मुंबईत प्रत्येक विभागात एक किंवा त्याहून अधिक शेल्टर होम सुरू करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे. उद्योग समूह, कॉर्पोरेट क्षेत्र, बँका सामाजिक संस्थांमार्फत हे शेल्टर होम चालवू शकतील. तसेच ज्या सामाजिक संस्थांकडे स्वत:ची जागा असल्यास किंवा भाड्याने जागा घेऊन ते चालवावे. त्यांना पालिकेच्या नियमानुसार भाडे दिले जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या नियोजन विभागाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in