मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून, प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषणात वाढ होत असल्याने श्वसनाच्या आजारासह सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रदूषणामुळे मुंबईच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. दरम्यान, मालाड पश्चिम येथील दोन रेडीमिक्स कॉंक्रीट प्लांटला स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्याचे पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
मुंबईत सहा हजार बांधकामे सुरू असून, वाढत्या प्रदूषणाचा धोका आरोग्यावर जाणवू लागला आहे. प्रदूषणाची पातळी खालावली असून, दमा, श्वसनाचे विकार, खोकला, सर्दी या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर जाणवू लागला असून, मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
दोन कॉंक्रीट प्लांटना स्टॉप वर्क नोटीस
रस्त्याचे काँक्रिट बनवणारे ‘आरएमसी’ प्लांट बंदिस्त करून काम करावे, असे निर्देश पालिकेने दिले असताना पी/उत्तर मालाड विभागात नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आल्याने दोन प्लांटला काम बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत चार ठिकाणी पी/उत्तर विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये दोघांना नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रेल्वेला नोटीस बजावणार
धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामाचे ठिकाणी बंदिस्त ठेवावे, स्प्रिंक्लर लावावेत, प्रदूषण मापक यंत्रणा बसवावी, कामगारांना मास्क, चष्मा द्यावा, असे निर्देश दिले असताना सांताक्रुझ स्टेशनवर प्रदूषण रोखणारी कोणतीही खबरदारी न घेता काम सुरू असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी एच/पश्चिम विभागाकडू तातडीने पथक पाठवून तपासणी करण्यात आली. नियम मोडल्यास रेल्वेला नोटीस बजावण्यात येणार असल्याचे एच/पश्चिम विभागाकडून सांगण्यात आले.
प्रदूषणाचे हॉट स्पॉट - बीकेसी, कुलाबा, मालाड आणि चेंबूर !
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सातत्याने खालावत असून, मंगळवारीदेखील बीकेसी, कुलाबा, मालाड आणि चेंबूर येथील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब नोंदविण्यात आला आहे. सफर या यंत्रणेकडून प्राप्त आकडेवारीनुसार या चारही ठिकाणांवरील हवा अत्यंत खराब श्रेणीत असून, पश्चिम उपनगरही सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत आहे.
चेंबूर - ३०३
बीकेसी - २२८
मालाड - २०३
कुलाबा - २०८